पुढारी प्रचारात व्यस्त ! मतदारांनी काढला पालिकेवर हंडा मोर्चा !

पाथर्डी -  उन्हाच्या मरण याताना भोगतोय... विजेचा लपंडाव चालूच आहे.. त्यातच आठ-आठ दिवस प्यायला पाणी नाही.. जगायचे की मरायचे... पाणी द्या. परिसराची स्वच्छता करा. पुढारी सगळे मत मागत फिरतायत.. मते मागायला दारात या.... मग आमचा हिसका दाखवू... प्रशासनाला ज्या भाषेत आमची भावना कळेल तसे आम्ही पाण्यासाठी काहीही करू... गावात जनावर राहतात की माणसं... याचा विचार करा. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध करत संतप्त महिलांनी पालिका कार्यालयावर पाणी व नागरी समस्यांबाबत हंडा मोर्चा काढला.                       

या आंदोलनामध्ये नीलम घोडके, लंका शिरसाट, राधा शेळके, मीरा शेळके, संगीता वारे, कमल घोडके, मीना नरोटे, पार्वती साळवे, धनराज घोडके, सुरेश हुलजुते, जगन्नाथ शेळके, अंकुश फुंदे, सुजाता पानगे, नीलम चव्हाण, सचिन नागापुरे, मंगल शिरसाट, आदि सहभागी झाले. शिवशक्ती नगर, आसरा नगर व माणीकदौंडी  रस्ता या विभागातील महिला सहभागी झाल्या. संतप्त महिलांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर धरत अत्यंत तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.पार्वती साळवे या जेष्ठ महिलेला तीव्र ऊन व बोलताना संताप अनावर झाल्याने रक्तदाब वाढवून चक्कर आली.यावेळी बोलताना साळवे म्हणाल्या, पालिका आरोग्य कर्मचारी आमच्या भागात फिरकत नाही. घाणीचे व काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. डास, दुर्गंधीमुळे जीव मुठीत धरून जगतोय. पुढारी राहतात तिकडे स्वच्छता, व आमचा भाग मात्र जाणीवपूर्वक टाळला जातो.

सर्व गावाला पूर्ण दाबाने तासभर पाणी तर आम्हाला मात्र अत्यंत कमी दाबाने अर्धा तास पाणी आठ दिवसातून एकदा मिळते. ओल्या कपड्याने अंग पुसले तरी आठ दिवस आम्हाला नळाचे पाणी आंघोळीसाठी पुरणार नाही. पुढारी तोंड दडून बसले. कोणत्याही निवडणुकीत दारात या. तेव्हा उत्तर देऊ तुम्हाला. गाव विकून खायचे तर खा, पण आम्हाला प्यायला पाणी व जगायला स्वच्छ परिसर द्या. महागाईने कितीही कष्ट केले तरी पोटाचे खळगे भरत नाही. शिळी भाकर व पाणी कालवून खायला सुद्धा पाणी नाही. तुमच्या दारात येऊन राहतो, आम्हाला फक्त पाणी द्या आणि उन्हापासून रक्षण करा. पाणीपट्टी, घरपट्टीला आमची घरे जप्त करायला येता. मग आम्हाला प्यायला पाणी कोण देणार. पाणी योजना होणार आहे या आश्वासनाने तहान भागत नाही. तुम्ही दोन तास फक्त पाण्या वाचून राहून दाखवा. असे म्हणतात उपस्थित कर्मचारी निरुत्तर झाले.

नीलम घोडके म्हणाल्या, दहा दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. परिसरातील सर्व हातपंप आटले आहेत. गावात कोठेही पाणी राहिले नाही. विकतचे पाणी सोन्यापेक्षा महाग झाले आहे. चौकशी करणाऱ्याला कर्मचारी दुरुस्तरे करतात." टाकीत पाणी नाही' लाईट पुरवठा बंद होता' वॉल खराब आहे' पाईपलाईन फुटली आहे' अमरापुरला टँकर भरले जातात म्हणून पाणी मिळत नाही' अशी उत्तरे देतात. पाणी कमी मिळूनही जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, अधिकारी, लोकप्रतिनिधी नेमके गावासाठी काय करतात असा प्रश्न निर्माण होतो. गावाला कोणी वाली उरले नाही. सर्वत्र घाण, डासांचे साम्राज्य, दूषित पाण्यामुळे साथ रोगाचा फैलाव सुरू आहे. सध्या फक्त वीस ते बावीस लाख लिटर पाणी मिळते. पाण्याची दैनंदिन मागणी व मंजुरी 35 लाख लिटरची असून पालिकेच्या उदासीनतेमुळे जिल्हा परिषद लक्ष देत नाही.  जिल्हा परिषदेने पाण्याचा कालावधी दोन तासाने वाढवावा. आम्हाला दोन दिवसांनी जरी पाणी आड दिले तरी चालेल, पण तहान भागवण्यापुरते तरी पाणी द्या. आज आम्ही शांततेत आलो. पुढचा मोर्चा तुमच्या लक्षात राहील असा आयोजित करू. जिल्हा परिषदेच्या दारात प्रसंगी आंदोलन करू. जिल्हा परिषदेने टंचाई परिस्थिती लक्षात घेता पालिकेला पाण्याचा कालावधी व जास्त पाणी वाढवून द्यावे. वॉल खराब असेल तर तो आम्ही दुरुस्त करणार का? गेली अनेक वर्षांपासून आम्ही वॉल खराब आहे.. एवढंच उत्तर ऐकतो. तर ते दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची आहे. आमची एक भगिनी आज चक्कर येऊन पडल्याने आज आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून माघारी फिरतो. पुढच्या वेळेस तुम्हाला कार्यालय बाहेर काढू. अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. उपस्थित महिलांनी घोषणा देत निषेध केला. पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वॉल दुरुस्तीसह जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचे आश्वासन दिल्यावर  आंदोलन तात्पुरते स्थगित केले.               

पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे शेवगाव पालिकेचाही पदभार असल्याने व पाथर्डी शेवगाव दोन्ही पालीकांना एकाच जायकवाडी उद्भवावरून पाणी मिळत असल्याने त्यांनी याबाबत जातीने लक्ष घालून दोन्ही शहरांना वाढीव पाणीपुरवठा व वीज पंपाचा कालावधी जिल्हा परिषदेने विशेषतः पाणीपुरवठा विभागाने वाढवून द्यावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पाण्यासाठी संतप्त नागरिक येत्या काळात कुठलेही टोकाचे पाऊल उचलतील एवढी परिस्थिती हाताबाहेर जात आहे.                                     


Post a Comment

0 Comments