देशाची सत्ता भटके समाज ठरवतील !

 

पाथर्डी -  देश स्वतंत्र झाला, पण भटक्यांची गुलामगिरी मात्र अद्यापही संपलेली नाही. भटक्यांची जनगणना नसल्याने भटके अजूनही भटकतच आहेत. भटक्यांमधील सर्वच पोट जातींनी एकत्र येत समाज हितासाठी संघटित आवाज उठवायचा आहे. येत्या काळात देशाची सत्ता भटके समाज ठरवतील असे संघटन व्हावे. पक्ष कोणताही असो, आपला संघर्ष राज्यकर्त्यांशी आहे. न्याय मिळेपर्यंत लढा चालूच ठेवू असा निर्धार भटका जोशी समाज सेवा संघाच्या राज्यव्यापी बैठकीत करण्यात आला.                   

समाजाचे संस्थापक अध्यक्ष वामनराव मापारे यांनी राज्याच्या विविध भागातून आलेल्या समाजाच्या प्रतिनिधींची बैठकीत संवाद साधला. अध्यक्षस्थानी पद्मश्री, कर्मवीर,तथा भारत सरकारच्या नीती आयोगाचे सदस्य दादासाहेब ईदाते तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर शास्त्री जोशी, समाधान गुराळकर, दापोलीच्या शिक्षण संस्थेच्या संस्थापक संपदा पारकर, आनंदा साळवे, चर्मकार विकास संघाचे सुभाष सोनवणे, रवींद्र गंगावणे, नारायण गदई ,बाबासाहेब महापुरे, शांतीलाल झुंगे, राजेंद्र जोशी, सोपान महापूर, आदींसह राज्याच्या विविध भागातून आलेले मान्यवर उपस्थित होते. श्रीक्षेत्र मढी यात्रेत १८ पगड जातींच्या जात पंचायती संपन्न होत. जात पंचायतींना शासनाने गेल्या सहा वर्षांपासून बंदी घातल्याने आता पंचायती बंद झाल्या. मात्र श्रद्धेने येणारे भटके समाज बांधव आपल्या समाज बांधवांना भेटण्यासाठी अत्यंत आतुर असतात. भटका समाज आपल्या समाजावर विलक्षण प्रेम करतो. मढी यात्रेत एकत्र येण्याची परंपरा टिकून राहावी म्हणून वैदू, कैकाडी या समाजाबरोबरच भटके जोशी समाज बांधव समाजाची बैठक, मेळावा घेऊन राज्यातील समाजाची संपर्क यंत्रणा अधिक सुसज्ज ठेवत आहेत.             

भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाणारी मढी अजूनही विविध जाती धर्मांच्या भटक्यांच्या उपस्थितीने जुनी ओळख विसरू देत नाही. यावेळी बोलताना मापारे म्हणाले, भटक्यांसाठीच्या कोणत्याच योजना भटक्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाहीत. अन्य समाजांनी ताकद दाखवून हक्क पदरात पाडून घेतले. जाती पोट जातींमध्ये गुरफटून आम्ही मात्र स्वतःला आणखी असुरक्षित केले आहे. भटक्यांची जनगणना झाल्यास शासनाला आमच्या यातना लक्षात येणार आहेत. आधार कार्ड, रेशन कार्ड लवकर निघत नाही. आम्ही भारतीय आहोत याचा पुरावा दाखवू शकत नसल्याने नवख्या गावात आम्हाला चोर समजून पिटाळून लावले जाते. संघटनेची शिफारस हाच पुरावा समजून शासनाने शिफारस पत्रावर कायम रहिवास पुरावे द्यावेत. अनुसूचित जाती जमाती सारखे भटक्यांना आरक्षण मिळायला हवे. शिक्षण, कर्ज सुविधा, घरकुल अशा सुविधा मिळत नसल्याने पोटासाठी गावोगावी भटकंती करावी लागते. लोकांचे भविष्य सांगण्याची कला आम्ही पोटासाठी जोपासली. मात्र त्यामुळे आमचे भविष्य घडवू शकलो नाही. जोशी समाजामध्ये मेंढगी, नगरकर, लासुरकर, मानकर, कुडमुडे, गड वाडकर, सरोदे, सरोदी, गोंधळी, वासुदेव, बागडी, चित्रकथी, काशी कापडी अशा विविध पोट जाती असून शिवरायांच्या सैन्य दलातील अनेक गुप्तचर जोशी समाजाचे होते. डोळ्यातील भाव, हावभाव, मूकसंवाद, खाणाखुणा, चित्रांवरून भाषा व संवाद साधून भटका जोशी समाजाने छत्रपतींची खूप सेवा केली. उपजत बुद्धिमान, कष्टाळू व विश्वासूपणे काम करणारा समाज जगण्यासाठी आधार मागत आहे. मूळ भटक्यांमध्ये अनेक चुकीचे वर्ग समाविष्ट केल्याने आमचे हक्क हिरावले जात आहेत. गेल्या 18 वर्षात समाज संघटनेने अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची तड लावली. बालविवाह बंदी, मृत्यूनंतर दफनविधी, ऐवजी दहनविधी, महिला व मुलींना शिक्षणासाठी सुविधा देण्याचे निर्णय यापूर्वीच घेतले असून यावर्षीच्या मेळाव्यात महिलांचा सहभाग प्रथमच झाला आहे. मोबाईलचा वापर कुटुंबामध्ये विशेषता महिलांमध्ये कमी व्हावा यासाठी समाज स्तरावर आतापासूनच दक्षता घेतली जात आहे. शासनाने आरोग्य कार्ड चे भटक्यांसाठी विशेष वाटप करून सर्वत्र आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आश्रम शाळांची सुविधा सहजतेने मिळाल्यास मुलाबाळांचा शिक्षणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. भटक्या समाजाला प्रवासात सरसकट पन्नास टक्के सवलत दिल्यास भटकंती करताना आर्थिक झळ बसणार नाही. भटक्या समाजाने संस्कृती व धर्म रक्षणाचे काम करत कष्टाने व स्वाभिमानाने आतापर्यंत वाटचाल केली आहे. देशाची खरी संस्कृती भटक्यांमध्येच दडली असल्याने शासन, प्रशासन व सुजाण देशवासीयांनी भटक्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन मापारी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब महापुरे, सूत्रसंचालन करून नारायण गदई यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments