विखेंच्या बॉडीगार्डकडून लंकेंच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण ?


पाथर्डी - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोकसभा निवडणूकीतील उमेदवार नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेत सहभागी झाल्याच्या रागातून खा. डॉ. सुजय विखे यांचा बॉडीगार्ड गौरव सुधाकर गर्जे याने सहकाऱ्यांच्या मदतीने शहादेव भानुदास पालवे यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, दि. ५ एप्रिल रोजी ही घटना घडल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास राजी नव्हते. फिर्यादी शहादेव यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या शहादेव यांचा पोलीसांनी जबाब नोंदविला. जबाब नोंदविल्यानंतरही गुन्हा दाखल होत नव्हता. शहादेव यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर दि. ११ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर फिर्यादीस फिर्यादीची प्रत देण्यासही टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर न्यायालयाने फिर्यादीची प्रत उपलब्ध करून दिली.

यासंदर्भात शहादेव पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे की, दि.५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहादेव हे चिचोंडी येथून नीलेश लंके यांची रॅली संपल्यानंतर दुचाकीवरून शिराळ मार्गे मजले चिंचोली येथे जात असताना शिराळ शिवारातील हॉटेल शिवतेज येथे पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन ते पुढे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून पल्सर मोटारसायकलवरून गौरव सुधाकर गर्जे तसेच ओमीनी गाडीतून रामेश्‍वर प्रकाश पालवे, ज्ञानेश्‍वर प्रकाश पालवे, सर्व रा. कोल्हार कोल्हुबाईचे ता. पाथर्डी तसेच इतर दोन अज्ञात इसम हे शहादेव यांच्याजवळ आले.


गौरव गर्जे याने शहादेव यांच्या दुचाकीस त्याची दुचाकी आडवी लावून ओमीनीमधील इसमांनी जवळ येत गौरव गर्जे याने शिविगाळ करण्यास सुरूवात केली. तु नीलेश लंके याच्या रॅलीत का फिरतोस ?  मी विखेचा बॉडीगार्ड आहे हे माहीती नाही का ? असे विचारत हातातीलन गजाने डाव्या बाजूच्या बरगडीवर मारहाण केली. गळयातील एक तोळयाची चेन ओरबडली. त्याच वेळी रामेश्‍वर प्रकाश पालवे याने डोक्यात दगड मारला आणि खिशातील १७ हजार ७५० रूपयांची रोकड काढून घेतली. इतर दोन अनोळखी इसमांनी पोटात लाथा बुक्क्यांनी, रॉडने मारहाण करीत गौरव गर्जे याने तुला मारून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर शिविगाळ करत सर्वजण घटनास्थळावरून निघून गेले.

मारहाणीनंतर जखमी शहादेव यांनी चिचोंडी येथे जाऊन प्राथमिक उपचार घेऊन नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. शहादेव यांच्या फिर्यादीनंतर सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंडा गर्दी कोण करतंय ?

नीलेश लंके समर्थकांवर गुंडा गर्दी दहशतीचे आरोप करून विखे पिता - पुत्र नागरीकांची दिशाभुल करीत आहेत. सभेमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना व्यासपीठावर बसवून भाषण करण्यास लावणे,  अंगरक्षकामार्फत लंके यांच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणे हे निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पुढे आले आहे. विखे साहेब गुंडा गर्दी, दहशत कोण निर्माण करतंय ? - सुवर्णा धाडगे राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्ष 

Post a Comment

0 Comments