पाथर्डीत श्रीराम नवमीचा जल्लोष..


पाथर्डी- हिंदू रक्षा युवा मंचच्या वतीने आयोजित श्रीरामनवमी जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने संपूर्ण पाथर्डी शहर अयोध्यामय झाले होते. तरुणांचा उत्साह व रामभक्ताच्या अभुतपुर्व गर्दीने या भव्य दिव्य मिरवणूकीने शहरवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शहराच्या इतिहासात आजपर्यंत झाली नाही अशी भव्य दिव्य मिरवणूक शांततेत पार पडली.

  जय श्रीरामाच्या घोषणेने शहर दुमदुमून गेले होते. संपूर्ण शहर भगव्या पताका, भव्य स्वागत कमानी, शहरातील प्रमुख मार्गावर लावलेली अखंड भगवी झालर यामुळे भगवेमय झाले होते. तर लाखो लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील सर्व धर्मीय स्त्री-पुरुषांनी रात्री उशिरापर्यंत प्रचंड गर्दी केली. संपूर्ण मिरवणूक मार्गावर विविध मंडळे व व्यापाऱ्यांनी खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, सरबत वाटप केले. माहेश्वरी युवक मंडळ, जैन सोशल फेडरेशन, रामनाथ बंग मित्र मंडळ यांनी शितपेय वाटप केले. मिरवणुकीमध्ये स्त्री-पुरुषांचे रामराज ढोल पथक, सिताहरण देखावा,  हरियाणा राज्यातून आणलेले महाकाल अघोरी पथक, यातील मिरवणूकेचे खास आकर्षण ठरलेले १२ फूट उंचीचा नंदी त्यावर शिव महाकाल, अघोरी न्यृत्य देखावा, भस्म आरती, शिवपार्वती विवाह, तांडव नृत्य, त्रिनेत्र धारी शंकर व त्यातून निर्माण होणाऱ्या ज्वाला याचबरोबर 'साई सेवा प्रतिष्ठान, 'दिव्य ज्योती जागृती संस्थान', वस्ताद लहुजी साळवे क्रांती मंच, सुवर्णयुग परिवार ट्रस्ट, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, संत सावता महाराज मंदिर, रामराज्य ढोल, पालखी पथक, वारकरी पथक, राम-लक्ष्मण सीता सहित सजवलेली घोडागाडी अशी एकूण तेरा पथके चित्र रथ संदेशासह सामील झाले होते. सलग दोन  महिने सराव करत शहरातील स्त्री-पुरुषां सह तरुण-तरुणींनी ढोल ताशाचे अतिशय उत्तम सादरीकरण केले. स्वामी समर्थ मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. संपूर्ण मिरवणुक मार्ग आकर्षक स्वागत कमानी, भगव्या पताकासह रांगोळ्यांनी सजवून काही चौकांमध्ये रांगोळी व फुलांच्या पाकळ्यांचा पाय घड्या अंथरल्या होत्या. राममंदिर व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा त्यावेळचा उत्साह जसा तसेच अगदी वातावरण रामनवमी मिरवणुकीसाठी शहरात झाले होते. मिरवणुकीची वेळ पाहून सर्वच कुटुंबीयांनी व व्यापाऱ्यांनी आपल्या दिवसाचे नियोजन केले. परिसरातील खेड्यापाड्यातूनही भाविक विशेषतः तरुण मंडळी मिरवणूक पाहण्यासाठी व सेवा कार्यासाठी सहभागी झाली. पालिकेच्या कामगारांनी संपूर्ण मिरवणूक मार्गाची साफसफाई केली. मिरवणूक मार्गावर महिलांनी औक्षण व आरती करून पालखी तील रामलल्लाचे दर्शन घेतले. पालखीवर फुलांची उधळण करण्यात आली. आकर्षक फटाक्यांच्या आतिषबाजीने शहर दुमदुमून गेले. खासदार डॉ सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादीचे नेते  ॲड. प्रताप ढाकणे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड  यांनी विविध चौकात मिरवणुकीचे स्वागत करत सक्रिय सहभाग नोंदवला.

स्वामी समर्थ मंदिर येथे शंकर महाराज मठाचे महंत माधव बाबा, ह भ प सुडके महाराज, रेणुका माता मल्टीस्टेट चे चेअरमन प्रशांत नाना भालेराव, जेष्ठ नेते प्रताप ढाकणे, प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, अभय आव्हाड, मृत्युंजय गर्जे, रामनाथ बंग, मुकुंद गर्जे, प्रतिक खेडकर आदींच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. काल सकाळपासून संपूर्ण शहर रामनवमीमय झालेले अनेक वर्षाच्या उत्सव परंपरेत शहरात प्रथमच घडले हिंदू रक्षा मंचचे उत्सवाचे यंदाचे बारावे वर्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक नियोजनासाठी पोलिसांना सहकार्य केले. पोलीस  निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मिरवणुकीत बंदोबस्ताचे  चांगले नियोजन केले. शोभेच्या दारूसह तोफांची  भव्य अतीषबाजी विशाल काय शिव महाकाल व अघोरी पथकाबरोबर फोटो काढण्यासाठी उत्साही लोकांची गर्दी, उत्साहाने राम लक्ष्मणाची वेशभूषा करून आलेली लहान मुले,  मिरवणूक बघण्यासाठी सायंकाळी आलेले मुस्लिम बांधव, तरुणाईचा ओसंडून वाहणारा उत्साह यामुळे संपूर्ण शहर राममय झाले होते. अशा पद्धतीचे वातावरण पाहून पुढील वर्षी अतीशय भव्य प्रमाणात उत्सव करण्याचा संकल्प संयोजकांनी बोलुन दाखवला. सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाल्याचे प्रथमच बघायला मिळाले. शहरातील सर्वच तरुण मंडळाचे या मिरवणुकीसाठी मोठे सहकार्य लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments