पाथर्डी- आर्थिक मागास, शेतमजूर, आत्महत्याग्रस्त
शेतकरी कामगार, ऊसतोड कामगार, एकल
पालकांचे गरजू, हुशार, होतकरू
विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत अशा निवडक
विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, सामान्य ज्ञान,
शिष्यवृत्ती परीक्षेसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी मोफत करून घेत
गेल्या दहा वर्षात अनेक विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या बेस्ट फाउंडेशनच्या
शिक्षकांनी तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळासह पालकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भगवान
एज्युकेशनल अँड सोशल टेक अशा नावाच्या म्हणजे बेस्ट फाउंडेशन मध्ये अत्यंत सेवाभावी
शिक्षक काम करतात. आदर्श शिक्षक भाऊसाहेब गोरे, प्रताप
देशमुख, महादेव कौसे, संदीप
काळे, रामनाथ शेळके, संजय
ससाणे, चंद्रकांत उदागे, महेश
वाघमोडे असे शिक्षक प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तालुक्यात विविध ठिकाणी नोकरी
करतात. या शिक्षकांचे शाळेमध्ये जसे दर्जेदार काम तसे तालुक्याच्या साहित्य,
कला, संस्कृती या सह सामाजिक उपक्रमांमध्ये
सुद्धा चांगले योगदान आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यातील चार शिक्षक स्वतःच्या
पगारातून यासाठीचा आवश्यक खर्च करतात. शहरातील सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते
राजेंद्र कोटकर यांनी स्वतःचा हॉल शैक्षणिक कार्यासाठी मोफत उपलब्ध करून देत
शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्यासह इतर कार्यकर्ते मदत करतात. या वर्गात
विद्यार्थ्यांना पेन, वह्या, मार्गदर्शक
पुस्तके, रजिस्टर, प्रश्नसंच,
कंपास पेटी, सराव पेपर, पॅड,
स्कूल बॅग, शालेय गणवेश, शूज
अशा विविध सुविधा दिल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने पाचवी ते आठवी या वर्गातील
विद्यार्थी आहेत.
विशेष
महत्त्वाचा भाग म्हणजे शहरातील डॉ. दीपक देशमुख, डॉ.
विनय कुचेरिया, डॉ. शिरीष जोशी यांचे कडून
विद्यार्थ्यांना मोफत आरोग्यसेवा पुरवली जाते. सुमारे 30 ते 40
विद्यार्थ्यांची एक बॅच स्लम एरिया, विविध
प्रकारची वसतिगृहे, शाळा विद्यालयांमधील शिक्षकांकडून ,
ग्रामीण भागातून माहिती घेत मुला-मुलींना या बॅच साठी निवडले जाते.
शिक्षणासाठी ज्यांचे कोणी नाही व शिक्षणासाठी ज्यांच्याकडे काही नाही अशा
विद्यार्थ्यांना बेस्ट फाउंडेशनचा मोठा आधार मिळून गेल्या दहा वर्षात सुमारे 600
विद्यार्थी या वर्गातून पुढे शिकून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल
झाले आहेत. इयत्ता पाचवी ची शिष्यवृत्ती परीक्षा, सहावी
व सातवीतील विद्यार्थ्यांसाठी डॉ. सी. व्ही. रामन बालवैज्ञानिक परीक्षा, आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध,
एन एम एम एस परीक्षा आदींची तयारी, मार्गदर्शन,
सराव वर्गातून करून घेतला जातो.
गणेश भागवत,
बबन भगत, रमेश वादवणे असे सेवाभावी सामाजिक
कार्यकर्ते या कामात दैनंदिन मदत करतात. दररोज सकाळी साडेसात ते नऊ या वेळेत
मार्गदर्शन, विषय वार तासिका जास्त गुण मिळवणाऱ्यांना
बक्षीस 100% उपस्थिती ला सुद्धा बक्षीस ,सण उत्सव साजरे केले जातात. व्यक्तिमत्व विकासावर व्याख्याने,
प्रसिद्ध व यशस्वी व्यक्तिमत्त्वांशी संवाद, तज्ञ
लोकांचे स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन, शैक्षणिक
चित्रफीत, लघुपट ,सिनेमा दाखवणे,
सुंदर हस्ताक्षर, छंद वर्ग, कार्यशाळा
दिवाळीनंतर विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांची चर्चा, कौटुंबिक परिस्थिती बघून त्या कुटुंबालाही सहकार्य केले जाते.
अभ्यासात अप्रगत विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते. ग्रामीण
भागातील विद्यार्थ्यांची निवास, भोजन, शाळा
प्रवेशा संबंधी अडचणी सोडवण्यास मदत केली जाते. अत्यंत हलाखीची परिस्थिती असणाऱ्या
विद्यार्थ्यांची परीक्षा फी सुद्धा शिक्षकांकडून भरली जाते. सामूहिक स्वरूपात
विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. आतापर्यंत वंचित उपेक्षितांच्या या सेवाभावी शाळेतील
विविध वर्गातील मिळून 370 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली आहे
.कोरोना काळात शिक्षकांनी मिळून दोन कुटुंबांना नियमित शिधा वाटप केले. त्याच
कुटुंबातील मुलीला सेकंड हॅन्ड सायकल दुरुस्त करून दिली. यापूर्वी काही वेळा दोन
बॅच घेऊन शिक्षकांनी सेवाभाव जपला. सेवा काम करताना इतरत्र वावरताना मन, भावना व डोळे उघडे ठेवून बघितलं तर अनेकांची दुःख दिसतात हे दुःख
निवारण करण्यासाठी आपले काय योगदान लागेल का या तळमळीतून शिक्षकांनी हाती घेतलेले
कार्य अनेकांना प्रेरणा देणारे ठरत आहे.
याबाबत माहिती
देताना संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे म्हणाले, आर्थिक
दुर्बल व उपेक्षितांचे जीणे जगणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थी योग्य संधी, मार्गदर्शन व सुविधे अभावी शैक्षणिक प्रवाहापासून दूर राहतात. सर्वच
अशा मुलांना स्वखर्चाने शिक्षण देणे शक्य नसले तरी आपला प्रपंच भागवून शिल्लक
पैशाचा वापर अशा काही मुलांसाठी केला, तर ती मुले
शिकून मोठी झाल्यावर आणखी कुणाला मदत करतील. परोपकार करत इतरांचे दुःख जाणून ते
दूर करणाऱ्या" खऱ्या" माणसाची साखळी या वर्गातून चालावी अशी अपेक्षा
आहे. शाळा सुटल्यानंतर व शाळेला जाण्यापूर्वी थोडासा वेळ देऊन आम्ही हे काम करतो.
आता या कार्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. त्यामुळे अंदाज बघून आम्ही
विद्यार्थी संख्या सुद्धा वाढवू. अनेक दुःखी कुटुंबे सेवाकाळात बघायला मिळाली.
मुलांना शिकवू शकत नाही, म्हणून अश्रू ढाळणाऱ्या आईबापांचे दुःख
बघितले, तेच दुःख या कार्या चे प्रेरणास्थान राहिले.
समविचारी शिक्षक यासाठी तयार झाले. आमची चांगली टीम तयार झाली. या कामातील आनंद
वेगळाच आहे. आता तर "आमच्या मुलाला तुमच्याकडे घ्या, म्हणणारे
पालक वाढले आहेत पण आमच्या सेवेवर सुद्धा मर्याद आहेत" . किती विद्यार्थ्यांची बॅच आहे, यापेक्षा शाळेकडे पाठ फिरवून गुन्हेगारी, बालमजुरी,
शेती काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आणून अ ब क ड शिकवले जाते.
हा विषय बघून अनेकांचे कौतुकाचे शब्द आता प्रेरणा देणारे वाटतात. या उपक्रमाला
अनेकांनी भेट देऊन पाहणी केली. काही शिक्षक नव्याने तयार होत आहेत. बाहेरगावी असा
उपक्रम राबवावा असा आग्रह होत आहे ,पण स्थानिक पातळीवर हा उपक्रम शक्य
होतो. अन्यत्र या उपक्रमावर मर्यादा येऊ शकतात. एका गावात एवढी मुले मिळत नाहीत.
त्यामुळे मध्यवर्ती ठिकाण म्हणून आम्ही पाथर्डी ची निवड केली आहे. सेवाकाम करताना समाजाच्या लक्षात आले या ठिकाणी चांगले
काम चालले आहे तर अनेकांच्या भावना मदत करण्यासाठी प्रेरित होतात. कोणी जागा देऊ
केली, कोणी शैक्षणिक साहित्य देण्याचे आश्वासन दिले,
कोणी मुलांच्या जेवणाचा खर्च उचलतो म्हणून सांगितले. आम्ही अजून
कोणाचं काही घेतलं नाही, पण लोकांच्या भावना या आम्हाला सेवाकार्यासाठी
प्रेरित करीत आहे. गावातील कोणाचा वाढदिवस
अथवा आनंदाचा प्रसंग असेल तर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ अथवा खेळणी इतर
साहित्याचे वाटप करतात मुलांना सुद्धा त्याचा आनंद मिळतो., असे
गोरे यांनी सांगितले.
0 Comments