भारतीय लष्कराने दिली अखेरची मानवंदना
अंतिम निरोप देताना हजारो नागरिकांचे डोळे पाणावले..
पाथर्डी प्रतिनिधी:- पाथर्डी तालुक्यातील अनेक तरुण भारतीय लष्करात देशातील विविध ठिकाणी विविध पदांवर कार्य करत भारत मातेची सेवा करत आहेत. काल तालुक्यातील शिरसाटवाडी येथील भारतीय सैन्य दलातील पलटन नायक या पदावर कार्यरत असणारे ज्ञानेश्र्वर कचरू सानप हे आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. आज शहीद जवान सानप यांच्या मुळ गावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी शिरसाटवाडी ग्रामस्थ, कुटुंबीय, मित्रपरिवार व तालुक्यातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शहीद सानप यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
शुक्रवारी दुपारी पाथर्डी शहरातून सैन्य दलाच्या वाहनामधून त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. अमर रहे..अमर रहे..ज्ञानेश्वर सानप अमर रहे.. भारत माता की जय. जय महाराष्ट्र, जय शिवराय अशा घोषणा देत, देश सेवा व कर्तव्य बजावत शहीद झालेल्या आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देताना सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तालुक्याच्या वतीने तहसिलदार उध्दव नाईक, पोलीस दलाकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी तांबे, पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अँड प्रताप ढाकणे, ओबीसी नेते दिलीप खेडकर, अविनाश पालवे, सेवानिवृत्ती सैनिक संघटना यांच्यासह अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहीली. शहीद जवान ज्ञानेश्वर सानप यांना अग्नी डाग दिल्यानंतर लष्करी जवानांनी बंदुकीतून हवेत फैरी झाडून अखेरचा निरोप दिला. शहीद ज्ञानेश्वर सानप यांच्याबरोबर असणाऱ्या सैन्य दलातील त्यांच्या सहकाऱ्यांना ही यावेळी अश्रू अनावर झाले. शहीद जवान सानप हे जम्मू काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात बर्फाळ प्रदेशात आपले कर्तव्यावर असताना डोक्याला मार लागल्याने जखमी झाले होते .त्यानंतर त्यांच्यावर उपचार ही झाले परंतु आजार अधिक बळावल्याने गुरुवारी सानप यांचे निधन झाले. सानप हे १५ मराठा एल आय गटात ते कार्यरत होते. गेली दहा ते बारा वर्षे त्यांनी सैन्य दलात सेवा दिली. ज्ञानेश्वर सानप हे अतिरेकी कारवाईत सहभागी होऊन त्यांनी अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले. ज्ञानेश्वर सानप हे सध्या सिक्कीम या ठिकाणी सेवेत होते. त्यांच्यावर पुणे येथे सैन्य दलाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शहीद ज्ञानेश्वर सानप यांच्या मागे त्यांच्या कुटुंबातील आई, वडील, पत्नी, बहीण यांच्यासह मित्रपरिवार व नातेवाईक यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
0 Comments