निवडणुकीनंतर बैलांची किंमत अडीच लाखावर !

पाथर्डी प्रतिनिधी :- पाथर्डीच्या बैलबाजारात गावरान खिलार जातीच्या बैलजोडीला आज दोन लाख एकावन्न हजार रुपये ऐवढी विक्रमी किमत मिळाल्याने बाजारात एकच चर्चेचा विषय ठरली.

तालुक्यातील पाडळी येथील प्रगतशील शेतकरी व सरपंच अशोक गर्जे यांची ही बैलजोडी चारचाकी वाहना ऐवढी किमत आल्याने आजच्या बाजारात चर्चेचा विषय ठरली. शेवगाव तालुक्यातील बागायतदार शेतकरी विजय कातकडे यांनी ही जिवा शिवाची बैलजोड विक्रमी किमतीला विकत घेतली. पाथर्डी तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर यांच्या उपस्थितीत हा सौदा पार पडला. यावेळी वाजत गाजत गुलालाची उधळण करत खरेदीदार शेतकरी व विक्री करणारे शेतकरी यांना फेटा बांधुन या बैलजोडी ची मिरवणुक काढण्यात आली. या बैलजोडी सह इतर अनेक बैलजोड्याचे सौदे दिड ते दोन लाख रुपयामध्ये झाले बैलांच्या जोडीला ऐवढी किमत मिळाल्याने बाजारात सर्वत्र त्याच चर्चा होत्या.

महाराष्ट्रात गावरान व खिलार बैलांसाठी प्रसिद्ध असलेल्या पाथर्डीचा बैलबाजार चांगलाच फुलू लागला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधन खरेदी-विक्रीसाठी येत आहे. बुधवारी भरणाऱ्या बाजारात शेकडो बैलांची खरेदी विक्री होऊन लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. बैलजोडीला आता लाखापेक्षा ही जास्त किंमत मिळत असल्याने आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला या बाजारामुळे चांगलीच चालना मिळाली आहे.दरवर्षी बहुतांश शेतकरी आपल्या बैलाची अदलाबदल करतात. आपल्याकडील बैलजोडी विक्री करून नवीन खरेदी करतात.  

मार्चमध्ये सुरुवातीला बाजारात पशुधनाची संख्या कमी होती. किमतीही कमी होत्या मात्र, दिवसेंदिवस बैलबाजारात पशुधनाची संख्या वाढत आहे. ५० हजारांपासून तर दोन लाख रुपयांपर्यंतचे महागडे बैल बाजारात विक्री व खरेदीसाठी येतात. त्याचबरोबर व्यापारी व शेतकऱ्यांची संख्याही खरेदी-विक्रीसाठी वाढत आहे. सध्या बैलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. बैलबाजारात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून व्यापारी बैल खरेदी-विक्रीकरिता येथे येतात. पशुधनाची संख्या व मागणी वाढत असल्याने भाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

दरवर्षी पेक्षा यंदा बैलांच्या किमती दुपटीने वाढल्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैल खरेदी करणे परवडत नसल्याची स्थिती आहे. पेरणीच्या तोंडावर बैलबाजारात तेजी आल्याने बैलांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, शेतीसाठी बैलांची खरेदी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी खरेदीदार रामनाथ खटके यांनी दिली. सर्वच ठिकाणी आजही शेती करण्यासाठी बैल हा अविभाज्य घटक असल्याचे मानले जाते. परंतु सध्या बैल जोडी महागली असून वयानुसार बैलजोडीची किंमत ठरत असल्याने जोडी मागे हजारो रुपयांची वाढ झाली आहे.

खरीप हंगामातील पेरणीच्या तोंडावर तालुक्यातील बहुतांश शेतकरी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला बैलजोडी खरेदी करून हंगाम संपल्यावर दिवाळीला परत विकून मोकळे होतातर ब्बी हंगामात काही प्रगतशील शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आधुनिक यंत्राद्वारे पेरणी करुन घेतात. मात्र, अनेक ठिकाणी पावसाळ्यात ट्रॅक्टर शेतात जाऊ शकत नाही. परिणामी बैलजोडीशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात खरिप हंगामापुरते बैलजोडी खरेदी करुन बहुतांश शेतकरी हा हंगाम पार पाडत असतात. त्यामुळे बैलजोडीचा भाव वाढला आहे. पूर्वी प्रत्येक शेतकर्‍याकडे बैलजोडी असायची. मात्र, कालांतराने दुष्काळ, चारा, पशुखाद्य महागल्याने बैलजोडी ठेवणे शेतकर्‍याला परवडेनासे झाले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी खरिप हंगामाच्या सुरुवातीला बैलजोडी खरेदी करतात आणि दिवाळी झाल्यावर विकून टाकतात.

पाथर्डीचा बैलबाजार महाराष्ट्रात तीन नंबरचा मोठा बैलबाजार ठरत आहे. यावर्षी तालुक्यात दुष्काळ असल्याने बैलांना चारा व पाणी उपलब्ध करणे जिकरीचे झाले आहे. शिवाय बैलांचा सांभाळ करताना आर्थिक ताण वाढत असल्याने सध्या शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करीत आहे. याउलट बैलजोडी असल्यास रोजच्या रोज त्यांची देखभाल करणे अतिशय कठीण व आर्थिकदृष्ट्या महाग आहे. असे अक्षय बोरूडे यांनी सांगितले .
 

Post a Comment

0 Comments