पाथर्डीत ओबीसीचा रास्ता रोको ! सरकारचा केला निषेध !

 

पाथर्डी - राज्य सरकार हे ओबीसींच्या भावनाशी खेळत असून एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर हे सरकार नाचत आहे. वडीगोद्री येथे सुरू असलेल्या प्रा.लक्ष्मण हाके व ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घेऊन ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात. जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला तर राज्यातील सर्व ओबीसी समाज पेटून उठेल. सरकार विरोधात मोठे आंदोलन उभे राहील व आगामी निवडणुकीत या आंदोलनाचे राजकीय परिणाम सरकारला भोगावे लागतील. असा खणखणीत इशारा माजी प्रशासकीय अधिकारी दिलीपराव खेडकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

पाथर्डी येथे ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचे प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या  आमरण उपोषण आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी शहरातील मुख्य चौकात कल्याण विशाखापटनम राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी दोन्ही बाजूने सुमारे चार ते पाच किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनात आपचे किसन आव्हाड, भाजपचे प्रा.सुनील पाखरे, नागनाथ गर्जे, संजय बेंद्रे,  प्रल्हाद कीर्तने,  माणिक खेडकर, शिवसेना शिंदे गटाचे सुरेश हुलजुते, माजी सरपंच गणेश चितळकर, शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ नेते नवनाथ चव्हाण,  दिनकरराव पालवे यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव सहभागी झाले होते.

"ओबीसी आरक्षण बचाव" साठी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचं वडीगोद्री येथे उपोषण सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असून सरकारकडून अपेक्षित दखल न घेतल्यामुळं राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. आज पाथर्डी येथे माजी प्रशासकीय अधिकारी दिलीप खेडकर यांचे नेतृत्वाखाली आंदोलकांनी कल्याण विशाखापट्टनम या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलन आक्रमक पवित्र्यात होते आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला. काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र, आंदोलकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. काही काळ आंदोलन स्थळी आंदोलन आक्रमक व तणावपूर्ण वातावरण बनले होते. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतल्या जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतल्यानंतर थोड्याच वेळात प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक आंदोलन स्थळी उपस्थित झाले. त्यानंतर आंदोलक शांत झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करत निवेदन स्वीकारले. व आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत तातडीने पोहोचवू, यातून योग्य तो मार्ग निघेल अशा आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी बोलताना खेडकर म्हणाले की, प्रा.लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. ओबीसी समाजाच्या आणि संघटनांच्या मागणीचा सरकारने गांभीर्यानं विचार करावा, यासाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. विविध ठिकाणी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येनं येऊन रास्ता रोको केला आहे.पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लिमकर, शिवाजी तांबे, पोलीस कॉन्स्टेबल राम सोनवणे,  अमोल आव्हाड, गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानप, नागेश वाघ व होमगार्ड जवानांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी पेटवले  टायर पोलिसांनी तत्परतेने विझजवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

जरांगेंच्या आंदोलनाला प्रतिसाद, मग हाकेंच्या का नाही- सरकार याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतंय, अशी आंदोलकांची भावना आहे. यापूर्वी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सरकारनं प्रतिसाद दिला, सरकारचे अनेक मंत्री आंदोलनस्थळी येऊन गेले होते. मात्र तसा प्रतिसाद लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला दिला नाही. हाकेंची तब्येत ढासळत असताना सरकार गप्प का, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. त्यांची तब्येत सातत्यानं खालावत आहे. तरी सरकारने यातून तात्काळ तोडगा काढावा अन्यथा यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलने राज्यभर ओबीसी समाजाकडून करण्यात येतील असे किसन आव्हाड,माजी जिल्हा संयोजक आम आदमी पार्टी यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments