कायदा व सुव्यवस्थेच्या माथ्यावर मूत्रविसर्जन !

पाथर्डी - होय लोकशाही व्यवस्था अबाधित राहण्यासाठी जनसामान्याच्या रक्षणासाठी असलेली कायदा व सुव्यवस्था राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पाळलेल्या भाडोत्री गुंडांच्या दावणीला बांधलेली असल्याचे चित्र पाथर्डी शेवगाव मतदार संघात दिसून येत आहे. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील चौका चौकात खुलेआम सुरू असलेले मटक्याचे अड्डे दारू विक्री बिंगोचा खुलेआम सुरु असलेला खेळ युवक पिढींना मूळ उद्देशापासून भटकावत असल्याचे कटू सत्य जाणकारांना पचवावे लागत आहे. पाथर्डी शहरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भर रस्त्यात अनेक अवैध धंदे सुरू आहेत. पोलीस ठाण्याच्या आवारा पासून ते शहराच्या हद्दीपर्यंत गावोगाव मटक्याचे आकडे घेणारी हिरवाईत नटलेली टपरी वजा दुकाने पोलीस दादाच्या आशीर्वादाने थाटात उभी आहेत. पोलीस व पुढारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून याकडे दुर्लक्ष करत आहेत. राष्ट्रीय महामार्गाला लागूनच अवैध दारू विक्री होत आहे त्यातूनच शहरात भांडणे,मारामाऱ्या.जातीय तणाव सुरू आहेत.

शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास अतिक्रमणाने कोडवलेला आहे. याकडे पाहायला पुढारी व अधिकारी यांना वेळ नाही. केवळ दिलेले टार्गेट पूर्ण करण्यात जो तो धावपळ करताना दिसत आहे. आपले हितसंबंध दुखवायला नको म्हणून आरडाओरडा करणाऱ्या तथाकथित खबर्यांना देखील पाकीट पुरवठा होत असल्याची जगजाहीर कुजबुज आहे. त्याशिवाय का एवढे खुले उद्योग सुरू आहेत.

शहरातील सहकार बँक प्रवेशद्वाराजवळ नगर कडे जाणारा व शेवगाव कडे जाणारा तसेच बीड कडून येणारा महामार्ग जोडला जाऊन डॉ. आंबेडकर चौक तयार झालेला आहे या चौकात फक्त सकाळी दिखावा करण्यासाठी ट्राफिक पोलीस उभा असल्याचे दिसून येते. मात्र रस्त्यावरील अतिक्रमणाला पाठबळ मिळत असल्याने या ठिकाणी अतिक्रमणांचा वेढा रहदारीला गोगलगायीचे रूप धारण करायला भाग पाडतो. नगर व शेवगाव यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यात फळ वाल्यांच्या गाड्या व ज्यूस वाल्यांची दुकाने अगदी रस्त्यावरच थाटलेली आहेत. याशिवाय बीड कडून येणारा रस्ता व शेवगाव कडे जाणारा रस्ता या कोपऱ्यात सहकार बँकेच्या शेजारी मावा विक्री करणारी टपऱ्या अगदी शहराचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीच्या तोंडावर मुरमाचा भराव करून नाली बुजून दिमाखात उभ्या करून पोलिसांच्या साक्षीने मावा विक्री करताना दिसून येत आहे या सर्व टपऱ्यांच्या समोर रस्त्यावर भर दिवसा मावा घेण्यासाठी व फळे खाद्यपदार्थ घेण्यासाठी दुचाकी व चार चाकी वाहनांची पार्किंग होते त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा होतो अनेक वाहने एकमेकाला धडकून नेहमीच वादविवाद होत असतात.

याबाबत पालिका प्रशासनाला विचारले असता ही जबाबदारी आमची नाही पोलिसांची व सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे असे साचेबद्ध उत्तर दिले जाते. राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हे मात्र तालुक्यात गेली अनेक वर्षापासून गर्भवती असल्याचे चित्र आहे मात्र त्यांची सुखरूप प्रसूती काही केल्या होत नाही त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांना पेढे किवा जिलेबी वाटता येत नाही केवळ प्रसव वेदना सहन कराव्या लागत आहेत.

याच सर्व गोष्टींनी व्यथित व उन्मत्त झालेला एक झिंगाट सामाजिक कार्यकर्ता अर्थात सोमरस पिऊन सामाजिक भान हरवलेल्या कार्यकर्त्यांनी या सर्व गोष्टीचा निषेध भर चौकात मूत्रविसर्जन करून काल संध्याकाळी केला. यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी याकडे किळसवाण्या नजरेने पासून दुर्लक्ष केले मात्र ही गोष्ट साधीसुधी नसून पोलीस,पालिका,राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सत्ताधारी पुढारी आणि मतासाठी कायम स्टंटबाजी करणारे विरोधी पक्ष पुढारी यांच्या डोळ्यात झंडू बाम घालून कानाखाली जाळ काढणारी घटना आहे. नव्हे नव्हे तर ह्या तळीरामाने कायदा व सुव्यवस्थेच्या माथ्यावर पाथर्डीतील भर चौकात मूत्रविसर्जन केले असेच म्हणावे लागेल. या सर्व गोष्टीचा करावा तितका निषेध थोडाच आहे. लोकशाहीच्या हितासाठी अशा मुरदाड व्यवस्थेचा निषेध करून भागणार नाही तर त्यांना खिंडीत पकडून त्यांचे पाणीपत करणे योग्य होईल.


Post a Comment

2 Comments

  1. पत्रकारांनी आपल्या लेखनातून हे मुद्दे मांडले पाहिजे... पत्रकार का गप्प आहेत , हे जनतेला चांगलेच माहीत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच दादा तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे

      Delete