पाथर्डी पालिकेकडून दिव्यांग निधीची फरपट !


पाथर्डी - दिव्यांग नागरिकांना पालिका नफा फंडातून देण्यात येणाऱ्या पाच टक्के निधीचे वितरण वर्षभरा पासून प्रलंबित असल्याने या निधीचे तात्काळ वितरण करावे या मागणीसाठी माजी नगरसेवक रामनाथ बंग यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना मागणीचे साकडे घातले.

पालिका नफा फंडातून पाथर्डी पालिका हद्दीतील दिव्यांग बांधवांना दरवर्षी पाच टक्के निधी मदत म्हणून वितरित केला जातो. मात्र सन २०२४-२५ सालाकरता असलेला दिव्यांग निधी यापूर्वी वारंवार मागणी करूनही अद्यापी वितरित न झाल्याने दिव्यांग बांधवांमध्ये पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत असलेली कोंडी फोडण्यासाठी नगरसेवक रामनाथ बंग यांच्यासह नागरिक शमा शेख,पांडुरंग बेंद्रे, सतीश रावतळे, रवींद्र सरोदे, संजय कुलकर्णी, दिलीप पावटेकर, चंद्रकांत शहाणे,योगेश कलंत्री आदींसह दिव्यांग बांधवांनी सोमवारी पालिका मुख्याधिकारी संतोष लांडगे यांची भेट घेत दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित निधीचे वितरण करण्याची मागणी केली.

दिव्यांग निधी दिवाळीपूर्वी वर्ग करावा अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली यावर मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी लवकरात लवकर दिव्यांग बांधवांच्या बँक निधी खात्यावर वर्ग केला जाईल असे आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. मात्र नेहमीप्रमाणे दिव्यांग बांधवांच्या मदत निधीबाबत पालिकेकडून दाखवण्यात येणारी उदासीनता कमी होऊन दिवाळीपूर्वी दिव्यांग बांधवांना सदरील निधी वितरित होईल का अशा स्वरूपाच्या चर्चा शहरातील दिव्यांग बांधवातून व्यक्त केल्या जात आहेत यावर पालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments