पाथर्डी – व्यापारी वर्गात व्यवहारातील देवाण
घेवाणी वरून वाद विवाद झाल्याचे ऐकीव असेल मात्र चुकीच्या ठिकाणी लघुशंका
करण्याच्या कारणावरून दोन व्यापाऱ्या मध्ये शिवीगाळ अन नंतर एकमेकाना फ्री
स्टाईलने गुद्धा गुद्धी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाथर्डी शहरातील पेठेत
झाली असून याबाबत खमंग चर्चा व्यापारी वर्गात व नागरिकात झडत आहे.
पाथर्डी शहरातील बाजारपेठ, कापड बाजार,नवी पेठ परिसरात कुठेही
सार्वजनिक ठिकाणी पालिकेने स्वच्छतागृह बांधलेले नाही. गेल्या १० वर्षापासून
मोठ्या प्रमाणावर जनतेतून आरडाओरडा झाल्यानंतर पालिकेने लाखो रुपये खर्चून दूर
अंतरावर ज्या ठिकाणी नागरिकांना जाणे सहज शक्य नाही अशा ठिकाणी म्हणजे वीर सावरकर
मैदानावर स्वच्छतागृह बांधले व ते देखील सर्व काळ बंदच असते. मात्र सोयीच्या
ठिकाणी बाजारपेठेत ग्राहकांना व व्यापारी वर्गाला स्वच्छतागृह नसल्याने मोठी
पंचायत होत आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान पेठेतील
समोरासमोर असलेल्या दोन दुकानदारांपैकी एका ज्येष्ठ दुकानदाराला अचानक लघुशंका
आल्याने व जवळ कुठेही लघु शंका करायला जागा नसल्याने ऐन वेळा भलती पंचायत होऊ नये
म्हणून लघुशंका आलेल्या दुकानदाराने शेजारच्या दुकानाच्या आडोशाला जाऊन हलके होण्याचा
सोपा मार्ग अवलंबला. मात्र त्याच वेळी त्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर बसलेल्या
दुसऱ्या दुकानदाराला शेजारच्या दुकानदाराचे हलके होण्याचे कांड लक्षात आले. मग काय
नेहमीच हलके होण्यासाठी चुकीची जागा निवडणाऱ्या दुकानदाराची खोड मोडायची म्हणून लघुशंका
करत असलेल्या दुकानदाराच्या अंगावर रेड हंड पाणी टाकून हलके होणाऱ्या दुसऱ्या
दुकानदाराची जिरवण्याचा यशस्वी प्रयत्न झालाच ! मात्र याचे पर्यावसन दुसरा हलके
होणारा व्यापारी दुकानदार भलता चिडला व त्याने लागलीच पाणी टाकणाऱ्या दुकानदाराला जोरजोरात
शिव्याची लाखोली वाहायला सुरुवात केली. दोन्ही व्यापाऱ्यांनी भर पेठेत एकमेकांच्या
दुकानांसमोर येऊन एकमेकांना जोरजोरात शिवीगाळ व कुलाचा उद्धार करायला सुरवात केली.
पाहता पाहता पेठेतील इतर व्यापारी, ग्राहक, येणारे जाणारे नागरिक यांची तुडुंब
गर्दी जमा झाली. मग काय सर्वांच्या साक्षीने एकमेकांना अश्लील शब्दात शब्दालंकार
वाहिले जात होते. त्यातच उन्हाच्या पाऱ्या बरोबर शिव्यांचा पारा अचानक वाढल्याने, शाब्दिक
चकमकीचे रूपांतरण हाणामारीत होऊन दोन्हीही व्यापाऱ्यांनी एकमेकाला चांगलाच लाथा
बुक्क्यांचा प्रसाद दिला. काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत घटनेचे गांभीर्य ओळखून
मध्यस्थी करत वाद कशावरून झाला याची चौकशी केली तर दोन्ही व्यापारी कारण सांगायला
लाजले परंतु खरे कारण मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांसमोर आल्यानंतर दोन्ही व्यापारी
ओशाळले. व त्यांनी आपला युद्धाचा पवित्रा थंड केला.
जमलेली गर्दी व मध्यस्थी करणाऱ्यांची गर्दी खरे कारण समजल्यानंतर विनोद
करत हळूहळू ओसरली असली तरी पाथर्डी पालिकेच्या वतीने बाजारपेठेत हयात कालावधीत
एकही स्वच्छतागृह बांधलेले नसल्यामुळे ग्राहक नागरिक व व्यापारी वर्गाची लघुशंका
करण्यासाठी त्रिधात रिपीट उडत असून महिला वर्ग तर बाजारपेठेत स्वच्छतागृह नसल्याने
जाण्यास धजावत नाहीत याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. बाजारपेठेत व दुकानांसमोर
अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी वाहने, मोकाट, जनावरे, अतिक्रमण करून उभारलेले शेड व
रस्त्यावर आलेल्या पायऱ्या यामुळे सहसा ग्राहक आता जुन्या बाजारपेठेत जाण्यास धजावत
नाहीत. एकंदर चुकीच्या ठिकाणी लघु शंका करण्याच्या कारणावरून झालेला व्यापाऱ्यातील
वाद आता पालिका पदाधिकारी व बेजबाबदार अधिकारी यांच्याविरुद्ध रोशाचे कारण होऊन
तूर्तास थांबला आहे. मात्र या घटनेबाबत व्यापारी पेठेत मनोरंजक चर्चा घडत आहेत.
0 Comments